Can't read Marathi text below?

मुख्य पान


रावसाहेब

पु.ल.देशपांडे.

"दिल्ले दान घेतले दान पुढच्या जन्मी मुस्सलमान" असा एक आमच्या लहानपणी चिडवाचिडवीचा मंत्र होता. दिल्ले दान परत घेणा~याने मुस्सलमानच कशाला व्हायला हवे ? दानतीचे दान काही धर्मावारी वाटलेले नाही. पण 'दाना'ला मुस्सलमानातल्या 'माना'चे यमक जुळते, एवढाच त्याचा अर्थ. पण दिल्ले दान कसलाही विचार न करता परत घेणारा देवाइतका मक्ख दाता आणि घेता दुसरा कोणीही नसेल.

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला काही उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात. पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्याचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे-येणे होते --- भेटणे-बोलणे होते --- पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरी नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी, --- कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात.

बेळगावच्या कृष्णराव हरिहरांशी अशीच गाठ पडली. त्यांना सगळे लोक 'रावसाहेब' म्हणायचे. ही रावसाहेबी त्यांना सरकारने बहाल केली नव्हती. जन्माला येतानाच ती ते घेऊन आले होते. शेवटपर्यंत ती सुटली नाही. बेताची उंची, पातळ पांढरे केस मागे फिरवलेले, भाग्याची चित्रे रेखायला काढतात तसले कपाळ, परीटघडीचे दुटांगी पण लफ्फे काढल्यासारखे धोतर नेसायचे, वर रेशमी शर्ट, वुलन कोट, एका हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि दुसऱ्या हाताच्या बोटांत करंगळीच्या आणि अनामिकेच्या बेचकीत सिगरेट धरलेली, तिचा चिलमीसारखा ताणून झुरका घ्यायची लकब. जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते रस्त्यातल्या भिकाऱ्यापर्यंत कुणालाही, दर तीन शब्दांमागे कचकावून एक शिवी घातल्याखेरीज गृहस्थाचे एक वाक्य पुरे होत नसे. मराठीला सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठी साज. साधे कुजबुजणे फर्लांगभर ऐकू जावे इतका नाजूक आवाज ! कुठल्याही वाक्याची सुरवात 'भ'काराने सुरू होणाऱ्या शीवीशिवाय होतच नसे. मराठीवरच्या कानडी संस्कारामुळे लिंगभेदच काय पण विभक्तिप्रत्यय-कर्ता-कर्म-क्रियापदांची आदळआपट इतकी करायचे की, दादोबा पांडुरंग किंवा दामले-बिमले सगळे व्याकरणवाले झीटच येऊन पडले असते. शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजत असेल तर समजो बापडे, पण जगाच्या दृष्टिने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता. आवेग आवरता येणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते. रावसाहेबांना तेवढे जमत नव्हते. तरीही रावसाहेब सभ्य होते. काही माणसांची वागण्याची तऱहाच अशी असते. की त्यांच्या हाती मद्याचा पेलादेखील खुलतो, आणि काही माणसे दूधदेखील ताडी प्याल्यासारखी पितात. रावसाहेब षोकीन होते. पण वखवखलेले नव्हते. जीवनात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले. पण उपाशी वाघ काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर नेईल ? सोन्याच्या थाळीतून पहिला दूधभात खाल्लेल्या धनुत्तर हुच्चराव हरिहर वकिलाच्या किटप्पाने पुढच्या आयुष्यात कधीकधी शिळ्या भाकरीचा तुकडाही मोडला होता. पण काही हस्तस्पर्शच असे असतात, की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. रावसाहेबांची घडण खानदारी खरी, पण माणूस गर्दीत रमणारा. अंतर्बाह्य ब्राँझने घडवल्यासारखा वाटे. वर्णही तसाच तांबूस-काळा होता. सिगरेटचा दमदार झुरका घेताना त्यांचा चेहरा लाल आणि काळ्याच्या मिश्रणातून होतो तसा होई. मग दहांतल्या पाच वेळा त्यांना जोरदार ठसका लागे. सिगरेट ओढतानाच काय, पण जोरात हसले तरी ठसका लागायचा. कारण ते हसणेदेखील बेंबीच्या देठापासून फुटायचे. स्मितहास्य वगैरे हास्याचे नाजून प्रकार त्या चेहऱ्याला मानवतच नसत. एकदम साताच्या वरच मजले.

ह्या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टूडिओत पडली. दहापंधरा वाद्यांचा ताफा पुढ्यात घेऊन मी गाणे बसवीत होतो. रेकॉर्डींगच्या आधीची साफसफाई चालली होती. विष्णुपंत जोग आपल्या पहाडी आवाजात गात होते. चाल थोडी गायकी ढंगाची होती. जोगांचा वरचा षड्ज ठ्यां लागला आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर ह्यांच्या वर चढलेल्या आवाजात कोणीतरी ओरडले --- "हा__ण तुझ्या आXX!"

ही इतकी सणसणीत दाद कोणाची गेली म्हणून मी चमकून मागे पाहिले. बाळ गजबर रावसाहेबांना घेऊन पुढे आले आणि मला म्हणाले ---
"हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बरं काय ----"
मी रीतसर नमस्कार ठोकला आणि रावसाहेबांनी आमची आणि त्यांची शाळूसोबत असल्यासारखा माझ्या पाठीत गुद्दा मारला.
  "काय दणदणीत गाणं हो xxxxx !" रावसाहेबांच्या तोंडची वाक्ये जशीच्या तशी लिहायची म्हणजे मुष्किलच आहे. शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेली माणसे अश्लील -- अश्लील म्हणून ओरडायची. (तबीयतदार तज्ञांनी फुल्या भरून काढाव्या.) "वा !--- पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं,
  "कोणाचा रे तू ?"
  तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या.
  "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें माइकचं बोंडूक वर उचलायला लावू या की. बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे xxxचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला. स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला.
  "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः ! हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले. रावसाहेबांचा हा अवतार मला अपरिचित असला तरी आमच्या स्टुडिओतल्या मंडळींना ठाऊक असावा. कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर लोक मनसोक्त हसत होते. रेकॉर्डिस्टने त्यांना आपल्या बूथमध्ये नेले आणि रावसाहेब त्या काचेमागून माना डोलवायला लागले. त्या माणसाने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकले.


This page is in Marathi and written using UTF-8 encoding.
If you are unable to read the text below in Marathi,